राज्यात १० पक्षांची महाआघाडी

SmartUp टिम : राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीसोबतची चर्चा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांच्या बैठका झाल्या आहेत. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच यासंबंधात निर्णय होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचा दावा केला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. त्यासाठी महाआघाडी हा एक उत्तम पर्याय आहे. कुणाचे प्राबल्य कुठे आहे, हे पाहून जागा वाटप होईल. यातही काही अचडण जाणार नाही, असे सांगत या महाआघाडीत शिवसेना व मनसेला स्थान नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, पुण्यात आमच्याकडेही सक्षम उमेदवार आहेत.

अद्याप जागांची चर्चा व्हायची आहे. कोणत्या जागा कुणाला द्यायच्या, हे ठरायचे आहे. जिंकण्याची क्षमता पाहून निर्णय घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, उमाकांत अग्निहोत्री, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *