विजय मल्ल्याची भारतात येण्यासाठी धडपड सुरू

SmartUp टीम : भारतातील विविध बँकांचे जवळपास ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून पळालेला मद्य सम्राट विजय मल्ल्याची भारतात येण्यासाठी धडपड सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची प्रत्यार्पण केस लंडनमध्ये सुरु आहे. या केसचा निकाल आठवड्याभरात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मल्ल्याने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) बोलणी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

लंडनच्या वेस्टमिनिस्टर कोर्टात विजय मल्ल्याची प्रत्यार्पण केस सुरु आहे. या केसमध्ये भारतीय तपास यंत्रणांनी मल्ल्या विरोधात ठोस पुरावे दिले आहेत. यामुळे   मल्ल्याला या केसमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच मल्ल्याने भारतीय अंमलबजावणी संचालनालयाकडे भारतात परतण्यासंदर्भात बोलणी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे.

अंमलबजावणी संचालनालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्या जरी स्वतः भारतात परतण्यासंदर्भात बोलणी करण्यास उत्सुक असला तरी त्याच्याविरुध्द दाखल केलेले फौजदारी गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत. जर तो तातडीने परतणार असेल तर त्याचा पासपोर्ट ब्रिटनच्या सरकारला परत करण्यास सांगण्यात येईल. जरी तो भारतात परतला तरी त्याला अटक केली जाईल. त्याला साधारणपणे दोन ते तीन दिवस तुरुंगात घालवावे लागतील. त्यानंतर त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत एका इंग्रजी वृत्तसंस्थेने मल्ल्याशी या संदर्भात संपर्क केला असता त्याने याबाबत स्पष्टपणे काही सांगण्यास नकार दिला. दरम्यान, मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात ५०० पानाचे दस्तऐवज सादर केले आहेत. तसेच त्याने गेल्या महिन्यात एक ट्विट केले होते की, तो २०१६ पासूनच बँकांची देणी देण्यास तयार होता. आता बँका यासाठी तयार आहेत का?

मल्ल्याने प्रत्यार्पण रोखण्यासाठी वेस्टमिनिस्टर कोर्टात बरेच नखरे केले होते. त्याने भारतातील तुरुगाची अवस्था वाईट असल्याचा युक्तीवाद केला होता. त्याला भारतीय तपास यंत्रणांनी सडेतोड उत्तर दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *