मोदी सरकारने प्रत्येक विमानामागे वाचवले ५९ कोटी, मिळवली सर्वोत्तम ‘क्वालिटी’

SmartUp टीम : राफेल विमानांच्या खरेदीबाबत लोकसभेत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आल्यानंतर आता या विमानांच्या किमतीबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या संपुआ सरकारपेक्षा प्रत्येक विमानाच्या खरेदीत 59 कोटी वाचवल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसमुहाने प्रसिद्ध केली आहे. याचाच अर्थ प्रत्येक विमान 59 कोटी रुपयांनी स्वस्त दरात भारताला मिळणार आहे.

नव्या खुलाशाप्रमाणे, मोदी सरकारने या व्यवहारामध्ये देशाचे भरपूर पैसे वाचवले आहेत. युपीए म्हणजेच संपुआ सरकारने 36 विमानांचा व्यवहार 1.69 लाख कोटी रुपयांमध्ये केला होता तर मोदी सरकारने ही विमाने केवळ 59 हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. म्हणजेच मोदी सरकारने प्रत्येक विमान 59 कोटी रुपये स्वस्त दरात मिळवले आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील व्यवहारानुसार प्रत्येक विमान 1705 कोटी रुपयांना घेण्यात येणार होते तर मोदी सरकारने तेच विमान 1646 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. तसेच या विमानांमध्ये आधी व्यवहार केलेल्या विमानांपेक्षा 13 सोयी आणि वेगळी तंत्रज्ञाने वापरलेली आहेत. या सोयी इतर कोणत्याही देशांना देण्यात आलेल्या नाहीत.

काँग्रेसने मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार हे विमान तीन पट किमतीस विकत घेत आहे असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या व्यवहारातील तरतूदी व नियम फ्रान्स आणि भारतातील करारानुसार प्रसिद्ध करता येणार नाहीत असे स्पष्ट केले होते. यावर राहुल यांनी आक्षेप घेत आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोनी यांच्याशी बोललो असून असा कोणताही गुप्ततेचा करार झाला नाही असे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे लोकसभेत सांगितले होते. इतकेच नव्हे तर याची माहिती तुम्ही सर्व देशाला देऊ शकता असेही मॅक्रोनी यांनी आपल्याला सांगितल्याचे राहुल यांनी लोकसभेत सांगितले. मात्र फ्रान्सने याचे तात्काळ खंडन केले. आपल्या राष्ट्राध्यक्षांनी अशी कोणतीही माहिती राहुल गांधी यांना दिली नाही असे फ्रान्सने त्याच दिवशी स्पष्ट केले. हीच विमाने फ्रान्सने इजिप्त व कतारला कमी किंमतीत विकली आहेत असाही काँग्रेसचा दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *